कोरोना मुळे एक बऱ्याच काळापासून डोक्यात घोळत असलेल्या विषयाला वाट सुचली.
महाराष्ट्रातील तालुका आणि गावपातळीवरील तरुणांचे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर अशा शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले.
तालुका पातळीवर इंजिनियरिंग, आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स, आयुर्वेदिक, होमियोपॅथी, ऍलोपॅथी सारख्या शिक्षण संस्था जोमाने वाढल्या आणि दरवर्षी हजारो उच्च पदवीधर निर्माण होऊ लागले.
परंतु बहुतेक पदवीधर नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थलांतरित झाले. त्याप्रमाणे शहरांमध्येच उद्योगधंदे वाढीस लागले आणि शहरांमध्ये अनेक सोयीसुविधा निर्माण झाल्या.
यातूनच इंडिया आणि भारत अशा एकाच देशाच्या दोन जीवनपद्धती जन्माला आल्या. एकीकडे शहरावरील ताण वाढू लागला तर दुसरीकडे ग्रामीण भाग जास्तच भकास होऊ लागला.
परंतु माहिती तंत्रज्ञान आणि वीज, रस्ते, इत्यादी मूलभूत सुविधा यांनी ग्रामीण भारत नवीन इंडियाशी जोडला जाऊ लागला.
विशेषकरून मोबाईल, इंटरनेट, क्रांतीने भलेमोठे मॉल बंद पडू लागले आणि ईकॉमर्स ने जसे संपूर्ण जगाला ग्लोबल व्हिलेज निर्माण केले तसेच भारतालाही इंडियाशी जोडले.
त्यामुळे दहा वर्षांपूर्वीचा ग्रामीण भारत आणि आजच्या ग्रामीण भारतामध्ये बदल घडून आलेला आहे.
आता जे पदवीधर शहरात नोकरीसाठी स्थलांतरित झालेत, त्यांचं आयुष्य शहरात कसे आहे? त्यांना हवी तशी नोकरी मिळाली आहे का? हवा तितका पगार मिळतोय का? हवं तस घर घेता आलेलं आहे का? हव्या तश्या शाळेत मुलांना शिक्षण मिळते आहे का?
सर्वात मुख्य म्हणजे हे सगळं करत असतांना खाजगी आयुष्य एन्जॉय करता येतंय का? कितीतरी तरुण परवडत नाही म्हणून छोटी घरे तेही कामाच्या ठिकाणाहून लांब कुठेतरी विकत घेतात आणि ईएमआयच्या विळख्यात अडकून पडतात.
बऱ्याच वेळा त्यांच्या मनात हे सगळं सोडून पुन्हा आपल्या गावी जावे असे विचार येतात, परंतु कुठल्यातरी कपोकल्पित लज्जेस्तव ते पुन्हा गावाकडे जाण्याला घाबरतात.
त्यांच्या बायका देखील त्यांना या निर्णयाला विरोध करतात. पुन्हा घाण्याला जुंपतात आणि ओढून ताणून शहरात आयुष्य व्यतीत करतात.
बायकांचा विरोध हा एका अंधश्रद्धेशी निगडित आहे, त्यांची अशी धारणा आहे की शहरातील शिक्षण व्यवस्था ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेपेक्षा चांगली आहे.
परंतु आजच्या शहरी भागातील मुलांची अवस्था ही मोबाईल आणि फक्त मोबाईल इतकीच राहिलेली आहे.
मुलांना कुठे सोडायची सोय नाही, सायकलवर शाळेत जाता येत नाही, कॉलनीतील मुलंमुली एकत्र खेळतांना दिसत नाहीत, आईवडील नोकरी करत असल्याने मुलांकडे बघायला कुणी नाही,
आज कोरोना मुळे कमीत कमी विचार करण्याची संधी निर्माण झालेली आहे.
आज समजा असे इंजिनियर, इतर पदवीधर ज्यांच्याकडे स्वतःची शेती आहे, पण ते नोकरीसाठी शहरात आहेत, अशांनी जर परत गावाकडे जाऊन शेती करायचं जरी ठरवलं, तरी त्यांच्या शिक्षणाचा आणि वडीलधाऱ्यांच्या अनुभवाचा सुंदर मिलाफ होऊन शेतीच उत्पन्न वाढू शकतं
नोकरीपेक्षा खूप चांगलं आयुष्य जगता येईल. आज शहरात एका दिवसाला जितका पेट्रोलचा खर्च आहे तितका खर्च गावाकडे संपूर्ण महिन्याला लागतो.
शहरात कमीतकमी ५० लाखाचं कर्ज घरासाठी, दहा लाखाची गाडी, आणि प्रत्येक महिन्याचे खर्च धरले तर पुढच्या दहा वर्षात किती रक्कम होते याचा अंदाज काढा.
गावाकडे तर स्वतःच घर आहे, त्यात आपल्यासाठी वेगळी बेडरूम फक्त बांधावी लागेल कदाचित, आणि उरलेल कर्ज काढायची गरजच नाही. म्हणजे महिन्याचा खर्च कमी, शिवाय गावाकडे हवापाणी चांगलं, शुद्ध भाज्या, ताज दूध असं सगळंच चांगलं आहेच की.
शहरातील जगण्याची जीवघेणी स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणार डिप्रेशन, स्ट्रेस, त्यातून वाढत चाललेली व्यसनाधीनता, घरातल्या मुलांसाठी बायकोसाठी वेळ नसणे, अशा कितीतरी त्रासदायक गोष्टी ग्रामीण भागात नाहीत.
आज शेतीवर जगभरात संशोधन झालेलं आहे, परंतु आपल्या देशातील तरुणांनी शेतीकडे पाठ फिरवल्यामुळे आज आपल्या शेतीची अशी दुर्दशा झालेली आहे.
त्यामुळे शेती हा व्यवसाय न राहता उपकारात्मक सामाजिक कार्य की जे फक्त सरकारी अनुदानावर चालते आणि राजकीय व्होटबँक इतकंच शिल्लक राहिले आहे.
जेवढी शारीरिक आणि मानसिक मेहनत शहरात तरुण घेत असतो, त्याच्या निम्मीदेखील मेहनत शेतीवर केली तरीसुद्धा नोकरीपेक्षा दुप्पट उत्पन्न शेतीतून निघू शकते.
तरुणांच्या शिक्षणातून, अनुभवातून आलेली कल्पकता, तंत्रज्ञानाची माहिती, जिद्द, याची आज शेतीला आणि पर्यायाने संपूर्ण समाजाला गरज आहे.
जितक्या समस्या आज शहरात राहतांना तरुण पिढी अनुभवते आहे त्याच्या मानाने शेतीमध्ये तितक्या समस्या नाहीत. आज आपल्या शेतीची जी दुर्दशा झालेली आहे त्याला तरुणांनी पाठ फिरवली हे देखील तितकेच महत्वाचे कारण आहे.
आज शेतीला इतक्या प्रकारचे जोडधंदे आहेत की त्याचा शहरातील तरुण विचार देखील करू शकत नाही.
शेतीबरोबर पशुपालन, दूध आणि दुधापासून बनणारे असंख्य खाद्य पदार्थ, शेतीसाठी लागणारे अवजारे, बी बियाणे, तंत्रज्ञान, शेतीतून तयार झालेल्या मालाचे लॉजिस्टिक इथपासून ते अगदी जगभरात निर्यातीची व्यवस्था आज संधी निर्माण झालेली आहे.
इंटरनेट आणि ईकॉमर्स च्या माध्यमातून जग जवळ आलेलं असतांना याचा प्रभावी आणि कल्पकतेने वापर करून जगभरात आपण शेतीचा व्यवसाय करू शकतो.
राहता राहिला प्रश्न सेक्युरिटीचा, तर खरेच शहरातील जॉब मध्ये आज सेक्युरिटी राहिली आहे का? कोरोनामुळे जागतिक मंदी असणार आहे यात काही शंका नाही, अशावेळी तुमची शहरातील नोकरी टीकेलच याची खात्री देऊ शकाल?
आजकाल ज्यांचा पगार जास्त त्यांनाच कंपन्या पहिल्यांदा काढून टाकतात. शिवाय कोरोना फक्त एक निमित्त आहे, याच्या आधीपासूनच आपल्या देशात मंदी सुरु आहे.
तेव्हा शहरात नोकरी नसतांना कसे आणि किती दिवस काढणार आणि हेच जर का गावाकडं असाल, आपली शेती कराल तर कुणावर अवलंबून तरी राहायची वेळ येणार नाही.
त्यामुळं सेक्युरिटी शहरात आहे की गावाकडं हा देखील विचार करायलाच हवा.
फक्त लोकलज्जा, पुन्हा शेती जमेल का, त्यासाठी पैसा कुठून उभा करायचा असल्या फालतू प्रश्नांचा विचार करत बसण्यापेक्षा, आपलं, आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य आणि आपल्या राष्ट्रच, देशाची गरज म्हणून तरुणांनी शेतीकडे वळणे काळाची गरज आहे.
शिकलेला तरुण जर शेतीकडे वळला तर आपण फक्त देशालाच नाही तर जगाला अन्न पुरवू शकू इतकी ताकद आपल्याकडे नक्कीच आहे.
तेव्हा ग्रामीण शिकलेल्या तरुणांनी सिरियसली विचार करायला हरकत नाही. इतरवेळी दररोजच्या धावपळीत विचार करायला सुद्धा वेळ नसतोआता
कोरोना मुळे शांतपणे स्वतःविषयी, आपल्याला आयुष्यात नक्की काय हवं आहे? कस आयुष्य जगावं? शहरातील ताणतणावाची धावपळ की गावाकडचं समृद्ध जीवन?
कोरोना है तबतक थोडा सोचोना
@निशांत माने