Pages




Thursday, 4 July 2013

थोर समाजसेवक - मदर तेरेसा


                        

अनाथ, अपंग , निराधार , वृद्ध, आजारी, कुष्ठपिडीत लोकांची मातेच्या ममतेने सेवा शुश्रूषा करणाऱ्या मदर तेरेसा यांना जग विश्वमाता म्हणूनच ओळखते.
    मदर तेरेसा यांचा जन्म युरोप खंडातील युगोस्लाव्हीया देशात इ.स. १९१० च्या सुमारास झाला. लहानपणापासून त्यांचा कल दुसऱ्यांचे दु:ख निवारण्याकडे होता. अनाथांची सेवा हीच प्रभूसेवा असेच त्यांचे विचार होते. संसार प्रपंचापासून त्यांचे मन निरिच्छ बनले. आयुष्यभर अनाथांची सेवा करीत राहणे हेच त्यांनी आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय ठरविले.
    भारतातील कोलकाता येथे जाऊन तेथेच आयुष्यभर अनाथांच्या सेवेला वाहून घेण्याचे तयांनी ठरवले. येथे आल्यावर त्या आपला देश विसरल्या, भारत हीच माझी कर्मभूमी, भारत हाच माझा देश, असे मानून त्या पक्क्या भारतीय बनल्या.
    त्यांनी ऐषारामी राहणे सोडून दिले. खादीची जाडी भरडी पांढरी साडी तसेच पोलके त्यांनी कायमचेच परीधान केले. डाळ भात हाच त्यांचा कायमचा आहार झाला. सेवा सुश्रूषा करण्याचे, मुलांना शाळेत शिकविण्याचे आवश्यक ते शिक्षण त्यांनी घेतले. बंगाली व हिंदी भाषा त्या शिकल्या. सुरुवातीला काही काळ शाळेत शिकवून त्यांनी स्वत:च झोपडपट्टीतील गरीब मुलांमुलींसाठी शाळा उघडली. चार विद्यार्थी घेऊन सुरु केलेल्या या शाळेत नंतर शेकडो अनाथ, गरीब मुले शिक्षण घेऊ लागली.या कामी त्यांना लोकांचीही मदत झाली.
    त्यांचे मन दया, करुणा ममतेने काठाकाठ भरलेले होते. टाकून दिलेल्या अनाथ लहान मुलांसाठी त्यांनी शिशुसदन उघडले. कृश, कुपोषित, आजारी शिशूंची त्यांनी मातेच्या ममतेने सेवा करुन आणि त्यांचे पालन पोषण करुन त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे केले.
    वृद्ध निराधार, अपंग लोकांसाठी वृद्धाश्रम उभा करुन त्‍या सर्वांची सर्व प्रकारची देखभाल त्यांनी केली. कुष्ठपिडीत लोकांवर उपचार करुन त्यांना निवारा व्यवसाय उभारुन दिला. पूर, भूकंप किंवा प्रचंड संकटांनी ग्रस्त झालेल्या भारतातील व परदेशातील लाखो लांकांना मदतीचा हात दिला. गरीब वस्तीत मोफत औषधोपचाराच्या सोई त्यांनी उपलब्ध करुन दिल्या. अशा प्रकारे आयुष्यभर त्या जनतेचे दु:ख निवरणाचे मानवतेचे कार्य करीत राहील्या. त्यांचे महान कार्य पाहून भारताने भारतरत्न आणि जगानेही नोबेल पारितोषिकाने त्यांना गौरव करुन सन्मानित केले. शेवटच्या क्षणपर्यंत मानवतेची सेवा करुन त्य ख्रिस्तवासी झाल्या.

थोर समाजसेवक - सावित्रीबाई फुले


                                                                  
एकोणिसाव्या शतकात पुण्याजवळील एका खेड्यात, एका गरीब कुटुंबात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्या काळी बहुजन समाज जवळजवळ अडाणी , निरक्षर, दरिद्री, अंधश्रद्धा दुष्ट सामाजिक रुढी परंपरांनी ग्रासलेला होता.
    स्त्रियांना शिक्षण घेता येत नव्हते आणि आताच्या सारख्या त्या काळी मुलींसाठीच नव्हे तर मुलांसाठीही शाळा नव्हत्या. घरी थोडे फार शिक्षण होई तेवढेच.  मुलींची, स्त्रियांची अवस्था तर फारच बिकट होती. चूल आणि मूल एकढेच त्यांचे क्षेत्र मर्यादित होते.
    सावित्रीबाईंचा विवाह लहान वयातच जोतिबा फुले यांच्याशी झाला. जोतिबा हे आधुनिक सुधारणावादी विचारांचे होते. स्वातंत्र्य , समता , बंधुता यांचे पुरस्कर्ते होते. मुलामुलींना शिक्षण घेण्याचा समान अधिकार आहे हे त्यांचे ठाम मत होते. सामाजिक भेदभाव, विषमता संपलीच पाहिजे असे ते विचाराने आणि कृतीने दाखवून देत.  अशा जोतिबांच्या पत्नी तरी कशा मागे राहतील. त्यांचेही आचार विचार पतीसारखेच होते.
    जोतिबांनी कर्मठ विचारसरणीच्या वर्चस्व असलेल्या त्या वेळच्या पुण्यात १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडली. हळूहळू त्यांनी इतर ठिकाणीही मुली, मुले आणि स्त्रिया यांच्यासाठी शाहा उघडल्या.
    मुलींच्या शाळेत शिकवायला शिक्षक मिळत नसत. म्हणून जोतिबांनी सावित्रीबाईंना सर्व प्रकारचे शिक्षण दिले. मुलींच्या शाळेत त्या शिकवू लागल्या. त्या वेळी स्त्रियांना घराबाहेर पडण्यासही बंदी होती.मग शाळेत जाऊन शिकविणे तर शक्यच नव्हते. सावित्रीबाईंनी स्त्रियांना कलंक लावला, धर्मबाह्य वर्तन केले, असे म्हणत कर्मठ विचारांच्या लोकांनी त्यांचा मानसिक, शारीरिक छळ करायला सुरुवात केली.
    सावित्रीबाई शाळेत जाताना आणि घराकडे परत येताना दुष्ट विचारांचे लोक त्यांना अपमानकारक शब्दांनी टोचू लागले. त्यांचा रस्ता अडवू लागले. काहींनी तर त्यांच्या अंगावर दगड गोटे मारायलाही कमी केले नाही. परंतु सावित्रीबाईंनी आपले समाजसेवेचे ध्येय सोडले नाही. छळ, अपमान सोसुन त्यांनी स्त्रि शिक्षणाचे अवघड कार्य पार पाडले.
    जोतिबांनी सुरु केलेल्या दुष्काळग्रस्त मुलांच्या आश्रमात सावित्रीबाई रात्रंदिवस राबून लहान मुलांचे संगोपन आणि शुश्रुषा करायच्या. शिक्षकाचे काम करीत असल्या तरीही शाळा चालविण्यासाठी त्या रात्री चटया विणून त्याच्या विक्रीतून खर्चाला हातभार लावायच्या. जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केल्यावर त्यात दाखल झालेल्या अनाथ मुलांच्या त्या माता झाल्या. त्याही मुलांचे संगोपण आणि देखभाल त्या करु लागल्या. गरीब आणि दलित बांधवांच्या मुलामुलींना कधी अंगावर कपडे नसत, तर कधी खाण्यासाठीही काही नसे, अशा वेळी सावित्रीबाई मायेच्या ममतेने त्यांना काय हवे नको ते पाहत असत.
    अनेक वर्षे सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यात भाग घेऊन सामाजिक सेवेला वाहून घेतले. त्यांना स्वत:ला मूलबाळ नव्हते. आपली सारी माया ममता त्यांनी या मुलांवर उधळली. छळ, अपमान आणि अपार कष्ट सोसून त्यांनी आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत अखंड समाजसेवेचे महान कार्य पार पाडले.

थोर समाजसेवक- महात्मा फुले

                                                               
                                                      


जोतिबा फुले हे थोर आणि महान समाजसेवक महात्मा या पदाला पोहोचले होते. निरपेक्ष भावनेने समाजाला प्रगतीचा, माणुसकीचा मार्ग दाखवून लोकांचे दु:ख दूर करणे, हेच त्यांनी आपले ध्येय मानले होते.दुष्ट रुढी, अनिष्ट परंपरा आणि भयंकर दारिद्र्याने समाजाला ग्रासले होते. बहुजन समाज ज्ञानापासून दूर होता. स्त्रियांची अवस्था तर गुलांमांसरखीच होती. हक्क आणि स्वातंत्र्य यापासून त्या दूर होत्या. जणू सुपूर्ण बहुजन समाज हा अंधारात चाचपडत दु:खाने पिडला होता.
    अशा काळात १८२७ साली जोतिबांचा जन्म पुण्यात झाला. जेतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर मातेचे नाव चिमणाबाई. जोतिबा हळूहळू मोठे होऊ लागले. वडिलांनी त्यांना मिशनरी शाळेत घातले. ज्ञानाने, वाचनाने जोतिबा विचारी झाले. आजूबाजूचा दु:खी, अज्ञानी, दरिद्री समाज त्यांना दिसू लागला.
    स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा अर्थ त्यांना समजला. स्त्रियांची दयनिय अवस्था त्यांना समजली. समाजातील विषमता, भेदभाव पाहिला. दलित बांधवांचे दु:खमय जीवन त्यांनी पाहिले. शिक्षणाचे महत्व त्यांना समजले. आणि जोतिबा अंतर्बाह्य बदलले. स्त्रियांना, मुलींना शिक्षण देणे, समाजातील भेदभाव दूर करुन बंधुभावाची शिकवण देणे, दलित बांधवांना माणुसकीचे, समानतेचे हक्क मिळवून देणे अशा सामाजिका कार्याला त्यांनी सुरूवात केली.
    पुण्यामध्ये त्यांनी मुलींसाठी आणि मुलांसाठी व स्त्रियांसाठी प्रथमच शाळा सुरु केल्या. सावित्रीबाई या आपल्या धर्मपत्नीला शिकवून त्यांच्यावर मुलींना, स्त्रियांना शिकविण्याचे काम सेापविले. समाजाचा छळ, अपमान सोसून सावित्रीबाईंनी जोतिबांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात साथ दिली.
    जोतिबांनी शिक्षणप्रसाराचे मोठे कार्य केले. अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम, दुष्काळग्रस्त मुलांसाठी आश्रम काढला. दलित बांधवांना शिक्षण आणि माणुसकीचे हक्क मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस देह झिजवला. शेतकऱ्यांच्या दु:खाला वाचा फोडली. कामगार , कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी मोठी चळवळ उभारली. बालहत्या प्रतिबंध गृह सुरु केले. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हे सर्व सामाजिक कार्य करताना त्यांना समाजाकडून छळ, अपमान आणि दु:खाला सतत सामोरे जावे लागले.आपल्या क्रांतीकारी कार्याने ते महात्मा या पदाला पोचले.
    सतुरस्र कार्य  करुन महात्मा फुले निजधामाला गेले.