Pages




Thursday, 4 July 2013

थोर समाजसेवक - मदर तेरेसा


                        

अनाथ, अपंग , निराधार , वृद्ध, आजारी, कुष्ठपिडीत लोकांची मातेच्या ममतेने सेवा शुश्रूषा करणाऱ्या मदर तेरेसा यांना जग विश्वमाता म्हणूनच ओळखते.
    मदर तेरेसा यांचा जन्म युरोप खंडातील युगोस्लाव्हीया देशात इ.स. १९१० च्या सुमारास झाला. लहानपणापासून त्यांचा कल दुसऱ्यांचे दु:ख निवारण्याकडे होता. अनाथांची सेवा हीच प्रभूसेवा असेच त्यांचे विचार होते. संसार प्रपंचापासून त्यांचे मन निरिच्छ बनले. आयुष्यभर अनाथांची सेवा करीत राहणे हेच त्यांनी आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय ठरविले.
    भारतातील कोलकाता येथे जाऊन तेथेच आयुष्यभर अनाथांच्या सेवेला वाहून घेण्याचे तयांनी ठरवले. येथे आल्यावर त्या आपला देश विसरल्या, भारत हीच माझी कर्मभूमी, भारत हाच माझा देश, असे मानून त्या पक्क्या भारतीय बनल्या.
    त्यांनी ऐषारामी राहणे सोडून दिले. खादीची जाडी भरडी पांढरी साडी तसेच पोलके त्यांनी कायमचेच परीधान केले. डाळ भात हाच त्यांचा कायमचा आहार झाला. सेवा सुश्रूषा करण्याचे, मुलांना शाळेत शिकविण्याचे आवश्यक ते शिक्षण त्यांनी घेतले. बंगाली व हिंदी भाषा त्या शिकल्या. सुरुवातीला काही काळ शाळेत शिकवून त्यांनी स्वत:च झोपडपट्टीतील गरीब मुलांमुलींसाठी शाळा उघडली. चार विद्यार्थी घेऊन सुरु केलेल्या या शाळेत नंतर शेकडो अनाथ, गरीब मुले शिक्षण घेऊ लागली.या कामी त्यांना लोकांचीही मदत झाली.
    त्यांचे मन दया, करुणा ममतेने काठाकाठ भरलेले होते. टाकून दिलेल्या अनाथ लहान मुलांसाठी त्यांनी शिशुसदन उघडले. कृश, कुपोषित, आजारी शिशूंची त्यांनी मातेच्या ममतेने सेवा करुन आणि त्यांचे पालन पोषण करुन त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे केले.
    वृद्ध निराधार, अपंग लोकांसाठी वृद्धाश्रम उभा करुन त्‍या सर्वांची सर्व प्रकारची देखभाल त्यांनी केली. कुष्ठपिडीत लोकांवर उपचार करुन त्यांना निवारा व्यवसाय उभारुन दिला. पूर, भूकंप किंवा प्रचंड संकटांनी ग्रस्त झालेल्या भारतातील व परदेशातील लाखो लांकांना मदतीचा हात दिला. गरीब वस्तीत मोफत औषधोपचाराच्या सोई त्यांनी उपलब्ध करुन दिल्या. अशा प्रकारे आयुष्यभर त्या जनतेचे दु:ख निवरणाचे मानवतेचे कार्य करीत राहील्या. त्यांचे महान कार्य पाहून भारताने भारतरत्न आणि जगानेही नोबेल पारितोषिकाने त्यांना गौरव करुन सन्मानित केले. शेवटच्या क्षणपर्यंत मानवतेची सेवा करुन त्य ख्रिस्तवासी झाल्या.

No comments:

Post a Comment