Pages




Thursday, 4 July 2013

थोर समाजसेवक - कर्मवीर भाऊराव पाटील

                                         

थोर पुरुषांनी बहुजन समाजाला दारिद्र्याच्या, निरक्षरतेच्या, अज्ञानाच्या खाईतून वर काढण्यासाठी आपले आयुष्य झिजवले, पणाला लावले अशा थोर पुरुषांत, समाजसेवकांत कर्मवीर भाऊराव पाटील यांची गणना होते. लोक त्यांना प्रेमाने कर्मवीर अण्णा असे म्हणायचे.
    कर्मवीर अण्णांचा जन्म २३ जून १८८६ रोजी महाराष्ट्रातील कुंभोज या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील , तर आईचे नाव गंगाबाई.
    प्राथमिक आणि थोडे इंग्रजी शिक्षण घेऊन अण्णांनी शरीरसंपदा कमावली, महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा आणि राजर्षी शाहू महाराजांच्या समाजसुधारणेच्या कार्याचा मोठा प्रभाव अण्णांवर पडला. त्यांचे विचार क्रांतीकारी बनले. आपला समाज सामाजिक भेदभावांनी, अन्यायी रुढी परंपरांनी, निरक्षरतेने, अज्ञानाने, दारिद्र्याने पिडलेला त्यांनी पाहिला. अशा बहुजन समाजाला शिकवून त्यांचे अज्ञान, दारिद्र्य दूर करण्याचा, दलित बांधवांना समानतेची, माणूसकीची वागणूक देण्यासाठी आयुष्यभर कष्ट करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले.
    एका दलित बांधवाच्या मुलाला घेऊन त्यांनी वसतिगृहाचीस्थापना केली. शाळा आणि वसतिगृहे उभारुन गरीबांच्या दारात शिक्षणाची गंगगा नेऊन पोचविली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शेकडो शाळा, तंत्रशाळा, शेतीशाळा, महाविद्यालयांची स्थापना केली. वटवृक्ष जसा फोफावतो, तसे शिक्षण संस्थांचे जाळे विणून अज्ञानी समाजाला शिकवून त्यांचे अज्ञान आणि दारिद्र्य दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
    दलित बांधवांना माणूसकिचे हक्क आणि सामाजिक समता मिळवून देण्यासाठीही त्यांनी खूप कष्ट घेतले.
    देश पारतंत्र्यात असलेला पाहून त्यांनी खादीचा स्विकार करुन स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. मजूर, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून त्यांना मानाने जगण्याची संधी मिळवून देण्यासाठीही देह कष्टविला. सत्यशोधक चळवळीचा प्रसार करुन अडाणी, रूढीग्रस्त समाजाला जाग आणण्याचे कार्य त्यांनी केले. कमवा आणि शिका योजना राबवुन विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्व पटवून देऊन आयुष्यभर शिक्षणप्रसार, सामाजिक समता, मजूरांचे व शेतमजूरांचे हित साधले. समाज सुधारणा करणारे कर्मवीर अण्णा तन मनाने झिजून १९५९ साली अनंतात विलिन झाले.

3 comments:

  1. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.!!

    ReplyDelete