Pages




Thursday, 4 July 2013

थोर समाजसेवक - बाबा आमटे

                          


दीपस्तंभ बनुन दु:खी लोकांच्या जीवनात आनंदाचा, सौख्याचा प्रकाश निर्माण करणारे बाबा आमटे हे एक महान समाजसेवक होते. स्वत: अपंगत्वाचे दु:ख भोगत असतानाही त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाचे दु:ख आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी खर्च केले.
    अशा थोर बाबांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. बाबांचे सर्व शिक्षण नागपूर येथे झाल्यावर समाजातील उपेक्षित लोकांसाठी, असंघटील लोकांसाठी काम करायला त्यांनी सुरुवात केली. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला. दलित बांधवांच्या वस्तीत शिरुन ते त्यांना त्यांच्या हक्काची जाणिव करुन देऊ लागले. लोकसेवेचे काम करता करता ते साफ सफाईचे, शौचालय साफ करण्याचेही काम करु लागले. आणि याच वेळेला कान नाक झडून गेलेला, जखमांनी विव्हळणारा, गटाराच्या कडेला पडलेला एक महारोगी त्यांच्या दृष्टीस पडला. तो असहाय्य जीव पाहून बाबांचे मन गलबलले, त्यांच्या मनातील करुणा जागी झाली. महारोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य पणाला लावण्याचे त्यांनी पक्के ठरवून जनसेवेचे व्रत स्विकारले.
    वरोडा, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, हेमलकसा येथे त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी श्रमदानाने आश्रम उभारले. उपेक्षेचे, अपमानाचे चटके सोसत समाजाने दूर लोटलेले असंख्य कुष्ठरोगी बाबांच्या आश्रमात आश्रयाला आले. कुष्ठरोग्यांची शुश्रूषा करुन ते त्यांची सेवा करु लागले.
कुष्ठरोग्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. डोंगराळ, जंगली जमीन त्यांनी साफ केली.पाण्यासाठी श्रमदानाने विहिरी खोदल्या. निवाऱ्यासाठी पक्क्या झोपड्या उभ्या केल्या.बाबांनी माळरानावर शेती उभी केली. औषधोपचाराने, मायेने बरे वाटू लागलेले कुष्ठरोगी या शेतात बाबांना मदत करु लागले. हळूहळू बाबांनी त्यांना सुतारकाम, लोहरकाम, पत्र्यापासून डबे, संसारोपयोगी वस्तू बनविणे, चटया विणणे, भाजीपाला, फळे विक्रीस पाठविणे असे विविध व्यवसाय शिकवून बाबांनी त्यांना आत्मनिर्भर बनविले. रोगमुक्त झालेल्या कुष्ठरोग्यांच्या वसाहती बाबांनी स्थापन्न केल्या. बाबांनी या वसाहतीला नाव दिले आनंदवन.
    कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी दवाखाने सुरू करुन बाबांनी त्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था केली. त्यांना आरोग्याचे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
    बाबांनी समाजसेवेचे वेगळे, अनोखे प्रयोग करुन त्यांत यश मिळविले. त्यांनी कुष्ठपिडीतांच्या आणि इतरही मुलामुलींसाठी शाळा आणि महाविद्यालये उघडली. अनाथ मुले, अपंग, वृद्ध यांच्या सेवेसाठी अनाथाश्रम, वृद्धाश्रम उघडले. जंगलातील जखमी अपंग प्राणी आणि पक्ष्यांसाठी औषधोपचाराची, पालनपोषणाची व्यवस्था केली.
देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आल्याचे पाहून बाबांनी भारत जोडो अभियान सुरु केले. बाबा स्वत: कमालीचे अपंग असून सुद्धा भारतभर पदयात्रा काढून त्यांनी सर्वांना भारताच्या एकतेचे, अखंडत्वाचे रक्षण करण्याची शिकवण दिली.
मानवतेची सेवा करता करताच हे महान योगी अनंतात विलिन झाले.

No comments:

Post a Comment