Pages




Friday, 14 March 2014

                                                       ---परीस---
एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि
तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....

तात्पर्य:प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या
लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात ...

Thursday, 4 July 2013

थोर समाजसेवक - आचार्य विनोबा भावे


                           


आपल्या आचारांतून, विचारांतून माणुसकीची, त्यागाची शिकवण देणारे आचार्य विनोबा भावे हे एक थोर मानवतावादी पुरुष होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, हा विनोबांचा गुणविशेष होता.
आयुष्यभर ब्रम्हचारी राहून लोकांची सेवा करण्याचे व्रत त्यांनी लहान वयातच स्विकारले होते. आयुष्यभर लोकांना माणुसकीची, त्यागाची शिकवण देणारे आणि स्वत: ते तत्व पाळणारे विनोबा त्यागाचे प्रतिक होते.
    विनोबांचा जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी इ. स. १८९५ मध्ये झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते गांधीजींचे शिष्य बनले. जन्मभर ब्रम्हचारी राहून गरीब जनतेची सेवा करायची, स्वत:साठी जगायचे नाही, तर आपले उभे आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी खर्च करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले होते.
    त्यांनी सर्वसंगपरित्याग केला होता. गुडघ्यापर्यंत धोतरवजा पंचा आणि खांद्यावर छोटा पंचा हा त्यांचा वेश होता. अगदी साधे आणि थोडे जेवण असा त्यांचा आहार होता. आश्रम हेच त्यांचे घर होते.
    स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला. तुरुंगात असताना त्यांनी आपल्या प्रवचनातून मानवतेची शिकवण दिली. ते चरख्यावर सूत कातायचे. माणसा माणसामध्ये भेदभाव करु नक. आपण सारे एकाच परमेश्वराची लेकरे आहोत असे ते सांगत असत. समाधानी वृत्ती माणसाला दु:खापासून दूर ठेवते. गरज नसताना साठा केला तर गरजू लोकांवर अन्याय होतेा.आपण इतरांचाही विचार केला पाहिजे.दुसऱ्याला देण्यातच खरा आनंद असतो. अशी शिकवण ते देत असत.
    गांधीजींच्या प्रेरणेने विनोबांनी वर्धा येथे पवनार आश्रम सुरु केला. आपल्या देशातील लोकांची हलाखीची स्थिती विनोबांनी पाहिली. लोकांना खायला पोटभर अन्न मिळत नव्हते. हाताला काम नव्हते. म्हणून विनोबांनी मोठ्या जमीनदारांना विनंती केली आपल्याकडची थोडी जमीन दान करा. असा प्रचार ते करु लागले. विनोबांच्या विनंतीवरुन अनेक मोठ्या श्रीमंत जमीनदारांनी विनोबांना जमीन दिली. विनोबा ही जमीन त्याच गावातील गरीब, भूमिहीन मजूरांना वाटून टाकायचे. गरीब लोक त्या जमिनीत कष्ट करुन पोट भरु लागले.
    अशा रीतीने विनोबांनी भूदान यात्रा सुरु केली. अनेक गावात ते जात. जमीनदारांकडून मिळालेली जमीन भूमिहिनांना वाटून ते पुढे जायचे. कष्टकरी, गरीब लोकांना अशा रीतीने विनोबा जमीन मिळवून देऊ लागले. पदयात्रा करीत ते गावागावात फिरत होते. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार ठिकाणी फिरुन विनोबांनी हजारो लोकांना मिळालेल्या जमिनीचे वाटप केले. गरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी सर्वांचा उद्धार करणारी सर्वोदय योजना सुरु केली.
    सर्वोदय योजनेव्दारे गरीबांना प्रगतीचा, प्रकाशाचा, सत्याचा, मार्ग दाखवून त्यांचे कल्याण साधणारे विनोबा चंबळच्या खोऱ्यात आले. तेथील भयंकर दरोडेखोरांनी हजारो लोकांचे जीवन धोक्यात आणले होते. अशा दरोडेखोरांचे प्रबोधनाव्दारे मतपरीवर्तन करुन विनोबांनी त्यांना माणसात आणले.
    स्वच्छतेचे महत्व विनोबांना माहित होते. ते स्वत:ही शौचकूपे साफ करायचे काम करायचे. स्वच्छता हाचे परमेश्वर असे ते सांगायचे. सर्वांचा उद्धार ही शिकवण देणारे आचार्य विनोबा भावे यांनी मानवतेची शिकवण देत १९८२ मध्ये देहत्याग केला.

थोर समाजसेवक - कर्मवीर भाऊराव पाटील

                                         

थोर पुरुषांनी बहुजन समाजाला दारिद्र्याच्या, निरक्षरतेच्या, अज्ञानाच्या खाईतून वर काढण्यासाठी आपले आयुष्य झिजवले, पणाला लावले अशा थोर पुरुषांत, समाजसेवकांत कर्मवीर भाऊराव पाटील यांची गणना होते. लोक त्यांना प्रेमाने कर्मवीर अण्णा असे म्हणायचे.
    कर्मवीर अण्णांचा जन्म २३ जून १८८६ रोजी महाराष्ट्रातील कुंभोज या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील , तर आईचे नाव गंगाबाई.
    प्राथमिक आणि थोडे इंग्रजी शिक्षण घेऊन अण्णांनी शरीरसंपदा कमावली, महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा आणि राजर्षी शाहू महाराजांच्या समाजसुधारणेच्या कार्याचा मोठा प्रभाव अण्णांवर पडला. त्यांचे विचार क्रांतीकारी बनले. आपला समाज सामाजिक भेदभावांनी, अन्यायी रुढी परंपरांनी, निरक्षरतेने, अज्ञानाने, दारिद्र्याने पिडलेला त्यांनी पाहिला. अशा बहुजन समाजाला शिकवून त्यांचे अज्ञान, दारिद्र्य दूर करण्याचा, दलित बांधवांना समानतेची, माणूसकीची वागणूक देण्यासाठी आयुष्यभर कष्ट करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले.
    एका दलित बांधवाच्या मुलाला घेऊन त्यांनी वसतिगृहाचीस्थापना केली. शाळा आणि वसतिगृहे उभारुन गरीबांच्या दारात शिक्षणाची गंगगा नेऊन पोचविली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शेकडो शाळा, तंत्रशाळा, शेतीशाळा, महाविद्यालयांची स्थापना केली. वटवृक्ष जसा फोफावतो, तसे शिक्षण संस्थांचे जाळे विणून अज्ञानी समाजाला शिकवून त्यांचे अज्ञान आणि दारिद्र्य दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
    दलित बांधवांना माणूसकिचे हक्क आणि सामाजिक समता मिळवून देण्यासाठीही त्यांनी खूप कष्ट घेतले.
    देश पारतंत्र्यात असलेला पाहून त्यांनी खादीचा स्विकार करुन स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. मजूर, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून त्यांना मानाने जगण्याची संधी मिळवून देण्यासाठीही देह कष्टविला. सत्यशोधक चळवळीचा प्रसार करुन अडाणी, रूढीग्रस्त समाजाला जाग आणण्याचे कार्य त्यांनी केले. कमवा आणि शिका योजना राबवुन विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्व पटवून देऊन आयुष्यभर शिक्षणप्रसार, सामाजिक समता, मजूरांचे व शेतमजूरांचे हित साधले. समाज सुधारणा करणारे कर्मवीर अण्णा तन मनाने झिजून १९५९ साली अनंतात विलिन झाले.