'महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या सागर किनार्याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणार्या अनेक स्थळांचा समावेश होतो. या किनार्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे.रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र (जुने नाव सिंधूसागर) आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुका वसलेला असून तालुक्याचे मुख्य ठिकाण मुरुड येथेच आहे. मुरुडमधून चार पाच किलोमीटर अंतरावर राजपुरी हे गाव आहे. हे गाव खाडीच्या किनार्यावर आहे. येथून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारु आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानीसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमरवानाची नेमणूक केली.राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमनवानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारुचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारुचे काही पिंप त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमरवानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमरवाना मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारु पिऊन झिंगले असताना पिरमरवानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करुन मेढेकोट ताब्यात घेतला.पुढे पिरमरवानाच्या जागी बुर्हाणरवानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुर्हाणरवानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.
Pages
Monday, 6 May 2013
जंजिरा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment