Pages




Thursday 4 July 2013

थोर समाजसेवक - सावित्रीबाई फुले


                                                                  
एकोणिसाव्या शतकात पुण्याजवळील एका खेड्यात, एका गरीब कुटुंबात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्या काळी बहुजन समाज जवळजवळ अडाणी , निरक्षर, दरिद्री, अंधश्रद्धा दुष्ट सामाजिक रुढी परंपरांनी ग्रासलेला होता.
    स्त्रियांना शिक्षण घेता येत नव्हते आणि आताच्या सारख्या त्या काळी मुलींसाठीच नव्हे तर मुलांसाठीही शाळा नव्हत्या. घरी थोडे फार शिक्षण होई तेवढेच.  मुलींची, स्त्रियांची अवस्था तर फारच बिकट होती. चूल आणि मूल एकढेच त्यांचे क्षेत्र मर्यादित होते.
    सावित्रीबाईंचा विवाह लहान वयातच जोतिबा फुले यांच्याशी झाला. जोतिबा हे आधुनिक सुधारणावादी विचारांचे होते. स्वातंत्र्य , समता , बंधुता यांचे पुरस्कर्ते होते. मुलामुलींना शिक्षण घेण्याचा समान अधिकार आहे हे त्यांचे ठाम मत होते. सामाजिक भेदभाव, विषमता संपलीच पाहिजे असे ते विचाराने आणि कृतीने दाखवून देत.  अशा जोतिबांच्या पत्नी तरी कशा मागे राहतील. त्यांचेही आचार विचार पतीसारखेच होते.
    जोतिबांनी कर्मठ विचारसरणीच्या वर्चस्व असलेल्या त्या वेळच्या पुण्यात १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडली. हळूहळू त्यांनी इतर ठिकाणीही मुली, मुले आणि स्त्रिया यांच्यासाठी शाहा उघडल्या.
    मुलींच्या शाळेत शिकवायला शिक्षक मिळत नसत. म्हणून जोतिबांनी सावित्रीबाईंना सर्व प्रकारचे शिक्षण दिले. मुलींच्या शाळेत त्या शिकवू लागल्या. त्या वेळी स्त्रियांना घराबाहेर पडण्यासही बंदी होती.मग शाळेत जाऊन शिकविणे तर शक्यच नव्हते. सावित्रीबाईंनी स्त्रियांना कलंक लावला, धर्मबाह्य वर्तन केले, असे म्हणत कर्मठ विचारांच्या लोकांनी त्यांचा मानसिक, शारीरिक छळ करायला सुरुवात केली.
    सावित्रीबाई शाळेत जाताना आणि घराकडे परत येताना दुष्ट विचारांचे लोक त्यांना अपमानकारक शब्दांनी टोचू लागले. त्यांचा रस्ता अडवू लागले. काहींनी तर त्यांच्या अंगावर दगड गोटे मारायलाही कमी केले नाही. परंतु सावित्रीबाईंनी आपले समाजसेवेचे ध्येय सोडले नाही. छळ, अपमान सोसुन त्यांनी स्त्रि शिक्षणाचे अवघड कार्य पार पाडले.
    जोतिबांनी सुरु केलेल्या दुष्काळग्रस्त मुलांच्या आश्रमात सावित्रीबाई रात्रंदिवस राबून लहान मुलांचे संगोपन आणि शुश्रुषा करायच्या. शिक्षकाचे काम करीत असल्या तरीही शाळा चालविण्यासाठी त्या रात्री चटया विणून त्याच्या विक्रीतून खर्चाला हातभार लावायच्या. जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केल्यावर त्यात दाखल झालेल्या अनाथ मुलांच्या त्या माता झाल्या. त्याही मुलांचे संगोपण आणि देखभाल त्या करु लागल्या. गरीब आणि दलित बांधवांच्या मुलामुलींना कधी अंगावर कपडे नसत, तर कधी खाण्यासाठीही काही नसे, अशा वेळी सावित्रीबाई मायेच्या ममतेने त्यांना काय हवे नको ते पाहत असत.
    अनेक वर्षे सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यात भाग घेऊन सामाजिक सेवेला वाहून घेतले. त्यांना स्वत:ला मूलबाळ नव्हते. आपली सारी माया ममता त्यांनी या मुलांवर उधळली. छळ, अपमान आणि अपार कष्ट सोसून त्यांनी आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत अखंड समाजसेवेचे महान कार्य पार पाडले.

No comments:

Post a Comment