Pages




Thursday 4 July 2013

थोर समाजसेवक - छत्रपती शाहू महाराज


                                 

सामाजिक बंधुभाव, समता, दलित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला व क्रिडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ते थोर महापुरुष म्हणजे छत्रपती शाहू महाराज.
    पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात इ.स. १८७४ मध्ये शाहू महाराजांचा जन्म झाला.
    बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घूऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघडला.
    बहुजन समाजाची धार्मिक, सामाजिक गुलामगिरी आणि त्यांचे दारिद्र्य यावर एकच उपाय, ते म्हणजे बहुजन समाजाचे शिक्षण. बहुजन समाजाला शिक्षण देऊन शहाणे करायचे, आणि आपली सत्तासंपत्ती, त्यांच्या कल्याणासाठी वापरायची हा क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतला. सर्व विद्याथ्यांसाठी वसतिगृहे आणि शाळांची उभारणी केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी आपला राजवाडाच त्यांनी खुला केला. त्यांच्या अशा कार्यामुळे गरीब, दलित आदी सर्व बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाचे दरवाजे कायमचे सताड उघडे केले.
    दलित बांधवांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांना ज्ञानी करुन त्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी महाराजांनी खास शाळांची, वसतिगृहांची स्थापना केली. दुष्ट रूढी परंपरांवर प्रहार करुन दलित बांधवांना माणूसकिचे मिळवून देण्यासाठी मोठा लढा दिला.
    क्रूर रूढी आणि प्रथांना पायबंद, हुंड्यांची भयानक रुढी, दारुचे दुष्परीणाम, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक ऐक्य, स्वदेशीचा आग्रह व प्रचार, बालविवाहाचे दुष्परीणाम असे लोककल्याणकारी विषय घेऊन समाज घडविण्यासाठी महाराजांनी अथक परिश्रम घेतले. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही.
    दुष्काळावर मात करण्यासाठी त्या काळी रोजगार हमी योजना सुरु केली आणि त्या योजनेतून रस्ते, तलाव, पूल बांधून
घेतले. मजूरांच्या लहान मुलांसाठी शिशु संगोपन गृहे उघडली. अपंग, अनाथ, आजारी वृद्धांसाठी अनेक ठिकाणी निराधार आश्रम सुरु केले. प्लेग या भयानक रोगापासून स्वसंरंक्षण कसे करावे त्यावर काय उपाय करावे याची माहितीपत्रके छापून लोकांचे अज्ञान दूर केले.
    सामान्य गरीब जनता माणूसकीला पारखे झालेले दलित बांधव यांना जागृत करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहण्यास अथक प्रयत्न करुन महाराजांनी त्यांना प्रगतीप्रथावर नेले. अधर्मावर, दुष्ट आणि क्रूर रुढी परंपरांवर कठोर प्रहार करुन मानव धर्माचा, माणूसकीचा, सामाजिक समतेचा, लोककल्याणाचा वृक्ष त्यांनी बहरत ठेवला. राजा असूनही ते लोकांसाठी, समाजासाठी राजऋषीसारखे जगले. समाजाला न्यायाचा, प्रगतीचा प्रकाश देणारे मार्ग दाखविणारे शाहू महाराजांचे १९२२ साली निधन झाले.

No comments:

Post a Comment