Pages




Thursday 4 July 2013

थोर समाजसेवक - अहिल्याबाई होळकर

                        

इंदूर संस्थानच्या अधिपती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौफेर कर्तबगारीने, चोख राज्यकारभाराने, कल्याणकारी समाजसेवेने त्यांचे नाव अजरामर झाले.
    अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मदतीला जवळचे कुणीही नसतानाही सुमारे ३० वर्षे राज्यकारभार सांभाळून त्यांनी सामान्य जनतेचे हित साधले व त्यांचे दु:,ख दारिद्र्य दूर करण्याचे कार्य केले.त्यांच्या लोकसेवेच्या जनहिताच्या कार्याने सामान्य जनता इतकी भारावली की, ती त्यांना देवतेप्रमाणे मानून पुण्यश्लोक अहिल्याबाई असे म्हणू लागली.
    अपार संकटे, अपार दु:ख त्यांच्या वाट्याला आले तरी अहिल्याबाई आपल्या जनहिताच्या, समाजसेवेच्या कार्यापासून कधी मागे हटल्या नाही. संस्थानिक म्हणून राज्य करताना ऐशआरामात न राहता त्या अगदी साधेपणाने, सात्विक वृत्तीने, आपले दु:ख विसरुन आयुष्याच्या अंतापर्यंत जनहिताचे कार्य करीत राहिल्या.
    अहिल्याबाईंचा जन्‍म्‍ा इ.स. १७२५ च्या सुमारास बीड जिल्ह्यात झाला. घरातील सात्विक वातावरणामुळे त्या घरच्या घरीच लिहायला वाचायला शिकल्या. त्या ज्ञानसंपन्न, सदाचारी आणि जनतेची दु:खे दूर करणाऱ्या साध्वी स्त्री होत्या.
    त्यांनी राज्याचा खजिना लोक कल्याणकारी योजना आणि समाजाच्या हितासाठी, समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी खर्च करायला सुरुवात केली. त्या तहानलेल्यांची तहान आणि भुकेलेल्यांची भूक भागवू लागल्या. निराधार, वृद्ध, अपंगांसाठी, त्यांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधल्या. सर्वांनर पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणी विहिरी खोदल्या. पाणपोयांची सोय केली. भुकेल्या लोकांना मोफत भोजन मिळावे म्हणून अन्नछत्रे उघडली. राज्याचे धन म्हणून म्हणजे जनतेची, लोकांची ठेव. हा पैसा समाजासाठी, गरजू लोकांसाठीच खर्च झाला पाहिजे असे अहिल्याबाई मानत असत. लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी, त्यांचे दु:ख दारिद्र्य दूर करण्यासाठीच त्या वापरु लागल्या.
    सर्व लोक समान आहेत कोणी मोठा नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही असे विचार मांडून त्यांनी सर्वांना समानतेने वागविले. गरीब, असहाय लोकांवर झालेला अन्याय त्यांनी कधी खपवून घेतला नाही. सामान्य लोकांवर अत्याचार, जुलूम, जबरदस्ती त्यांनी कधी होऊ दिला नाही.
    लोकांच्या सुख सुविधांकडे त्यांचे सतत लक्ष असायचे. अन्न धान्‍य किंवा पाण्याची टंचाई त्या कधी जाणवू देत नसत. गरीब आणि असहाय्य लोकांना त्या नेहमी आर्थिक मदत करायच्या. काळानुरूप त्यांनी लोकहिताचे कायदे केले. जाचक कायदे रद्द केले. त्यांच्या राज्यात स्त्रियांना अधिकार आणि मानाचे स्थान होते. त्या नेहती कायद्यानुसारच राज्यकारभार करायच्या. धार्मिकतेच्या आहारी जाऊन त्यांनी कधी लोकांचा पैसा उणळला नाही. राज्याचा पैसा त्यांनी काटेकोरपणे सामान्य जनतेच्या हितसाठीच वापरला. त्या अनाथांच्या पालनकर्त्या होत्या. दयाळूपणा, समाजहिताचा कळवळा, जनतेचे दु:ख निवारण, प्रेम, औदार्य म्हणजे अहिल्याबाई, असे जनता मानत होती.
    सामान्य जनतेच्या तारणहार पुण्यश्लोक अहिल्याबाई इ. स. १७९५ च्या सुमारास स्वर्गवासी झाल्या.

No comments:

Post a Comment